ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

असंख्य आव्हानांना तोंड देणारी रायगडची जनता 

माणगांव (राजन पाटील) :

कोविड-१९ चे संपूर्ण जगावर संकट असताना शासनाच्या आरोग्य व्यवस्थेची धावपळ होत होती. संपूर्ण देश महामारीला तोंड देत होता. याच काळात ३ जूनच्या निसर्ग चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी रायगड जिल्हा आला.

निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर असलेल्या नारळ, सुपारीच्या बागा व डोंगराळ भागातील पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या आंबा, काजू व फणसाच्या बागा वादळाच्या प्रचंड वेगाने जमिनदोस्त झाल्या. यामध्ये सर्वांच्याच राहत्या घरांचे नुकसान झाले. छप्पर उडाले, अनेक जण बेघर झाले. काहींनी तर यामध्ये आपला जीव गमावला.

शासनस्तरावरून नेतेमंडळींनी वादळ नुकसानीवर नजर फिरवली आणि फक्त मदतीची घोषणा केली. पंचनामे झाले काही खरे तर काही खोटे. शासनाकडून काही जणांना तुटपुंजी मदतही मिळाली. खात्यात जमाही झाली मात्र यामध्ये सर्वांनाच योग्य न्याय मिळाला नाही. ज्याच थोडे नुकसान त्याला पैसे अधिक. तर काही ठिकाणी जे बेघर झाले ते मदतीपासून वंचित राहीले. पण अशा कठीण काळातही कोकणातील विशेषतः रायगडातील शेतकरी, कामकरी, चाकरमानी निस्तेज झाला नाही. कुणीही निराश, हतबल होऊन आत्महत्या केली नाही. ना आपल जीवन अन्य मार्गांनी संपवले. तर समोर आलेल्या संकटांना, आव्हानांना रायगडातील संपूर्ण जनता सामोरी गेली. प्रत्यकाने आपल्या स्वतःच्या हिमतीवर घर आवरले, सावरले आणि स्वखर्चाने घरांवर छप्पर घातले, सुखी झाले.

शासनाने नारळ, सुपारी, आंबा बागायतीच्या मदतीत तर क्रूर चेष्टा केली. नारळ, सुपारी, आंब्याच्या रोपांची लागवड केल्यावर किमान १० वर्षांनी येणारं उत्पन्न लक्षात घेता एका नारळाच्या झाडासाठी ५०/-रू व सुपारीसाठी २०/-रू नुकसान भरपाई दिली आणि आक्कलेचे तारे तोडले. 

कोरोनाच्य सावटात भयभीत झालेल्या इथल्या शेतकऱ्यांच्या पावसाच्या नियमिततेने आशा, आकांक्षा पल्लवीत झाल्या. भाताचे कोठार असणाऱ्या या जिल्ह्यात भात शेतीची लागवड माझ्या शेतकरी राजाने केली. पाऊस नियमित व पोषक होता मात्र पावसाच्या उत्तरार्धात नक्षत्रानी अक्षरशः ओला दुष्काळ आणला. सोन्यासारखा भरभरून आलेल्या भात पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. वारा व पावसाच्या प्रचंड प्रमाणाने शेती पाण्याखाली आली. ही परिस्थिती देशासह राज्याच्या सर्वच भागात निर्माण झाली असली तरी कोकणातील रायगड जिल्ह्यात त्याची तीव्रता अधिक आहे.

या सर्वांवर मात करता करता पावसाळा सूरू झाला. झालेल्या न्याय अन्यायाची तमा न बाळगता शेतीच्या कामाला सुरुवात झाली. इथल्या जनतेच्या भल्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांनी टाहो फोडला नाही ही मोठी शोकांतिका. उभ्या शंभर वर्षांतील हा प्रसंग सर्वांनी मोठ्या धीराने निभावून नेला.

शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून नेला. या दुष्काळी परिस्थितीची शासनस्तरावरून दखल घेत आहेत की नाही याबद्दल शंकाच आहे. 

एक तर आधीच कोविड-१९ च्या संकटामुळे उद्योग व्यवसाय बुडाल्याने हवालदिल झालेल्या कामगार, व्यापारी, दुकानदार, वाहनचालक, सर्व सामान्य नोकरदार, आदिवासी समाज उघडयावर आला आहे. शेतकरी त्रस्त, संतप्त झाला आहे. तरीही छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या या रायगडच्या मर्द मावळ्या जनतेने धीर सोडला नाही आणि सोडणारही नाही. जरी इथल्या राजकीय नेत्यांनी कर्तृत्वाची नांगी टाकली असली तरी इथली जनता, इथला बळीराजा स्वतः च्या मनगटात असलेल्या ताकदीवर आणि आत्मविश्वासाच्या बळावर उद्याचे स्वप्न साकार करणार आहे.

Comments

Popular posts from this blog