मांजरवणे आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र पडलंय आजारी! प्राथमिक आरोग्य सेवेचे वाजले तीन-तेरा
माणगांव (राजन पाटील) : कोविडच्या पार्श्वभूमीवर आजच्या गतिमान काळात आरोग्य यंत्रणा चांगली सुविधा देत असली तरी शासनाच्या आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून रूग्णांवर किमान प्राथमिक उपचार व्हावेत याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्याशी संलग्न उपकेंद्रांची निर्मिती शासनाने केली आहे. मात्र मांजरवणे पंचक्रोशीतील आरोग्यवर्धिनी केंद्र मांजरवणे या शिलिम येथील आरोग्य केंद्रात विशेषतः रात्री रूग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका, शिपाई मदतनीस नसल्याने या आरोग्य केंद्राची अवस्था एखाद्या आजारी पडलेल्या रूग्णासारखी झालेली दिसत आहे. या परिसरातील सर्वसामान्य जनतेची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.
खरं तर हे आरोग्य केंद्र बाहेरून चांगले असले तरी अंतर्गत भागातील आवस्था पाहण्यासारखी राहिलेली नाही. येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी कर्मचारी नसल्याने रूग्णांची मोठी हेळसांड होते, मग येथील बिचाऱ्या गरिब जनतेला प्राथमिक उपचारासाठी सुद्धा गोरेगाव अथवा माणगाव येथे जावे लागत असल्याने येथील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या परिसरातील राहणाऱ्या शेतकरी, कामकरी, शेतावर काम करताना साप अथवा विंचू दंश झाला, रात्री अपरात्री एखाद्या माणसाला चक्कर आली अथवा गंभीर आजारी पडला तर अशावेळी त्या संबंधित रूग्णावर प्राथमिक उपचार करण्यासाठी जर वैद्यकीय आधिकारी उपलब्ध झाले नाही तर प्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी जि. प. मुख्य आरोग्य यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा या पंचक्रोशीतील जनता संतप्त भावनेने आंदोलन करेल असा इशारा 'न्यूज २४ तास मराठी'चे पत्रकार भिवा पवार तसेच जनतेचे स्वराज्य या संघटनेचे शिलिम गावचे प्रमुख अक्षय खेडेकर यांनी दिला आहे. तसेच या पंचक्रोशीतील जनता या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरेल असा विश्वास व्यक्त केला.


Comments
Post a Comment