बार्टी व बौद्ध धम्म सामाजिक संस्था माणगांव आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरास भरघोस प्रतिसाद
स्पर्धात्मक युगात दर्जात्मक शिक्षण गरजेचे - आमदार भरतशेठ गोगावले
स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरे जाणे आवश्यक - डीवायएसपी निलेश तांबे
भविष्यात तालुकानिहाय मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणार - पंकज तांबे
साई/माणगाव : हरेश मोरे
एकविसाव्या शतकातील संगणकीय व स्पर्धेच्या युगात दर्जात्मक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रीय स्मारक महाड येथे रविवार दि. १९ डिसेंबर रोजी महाड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले तर या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांकरिता विद्यार्थी विद्यार्थिनींनी व स्पर्धकांनी आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची गरज असल्याचे मत महाडचे डीवायएसपी श्री निलेश तांबे यांनी व्यक्त केले .याप्रसंगी प्रा. जाहिद वलिले व प्रा. संभाजी सूर्यवंशी यांनी या स्पर्धात्मक परीक्षांकरता अत्यावश्यक असणाऱ्या पूर्व तयारीसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षेत मराठी विशेषकरून कोकण विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा घसरता टक्का लक्षात घेऊन महाड येथील बार्टी संचालित डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व बौद्ध धम्म सामाजिक संस्था माणगावच्या संयुक्त विद्यमाने आज महाड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते या शिबीराला तिन्ही तालुक्यांतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी भरघोस प्रतिसाद दिला .या मार्गदर्शन शिबिराला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह महाडचे डीवायएसपी निलेश तांबे प्रा. जाहिद वलिले ,प्रा. संभाजी सूर्यवंशी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना अशा स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन शिबिरातून परीक्षेकरता आवश्यक असलेले बहुमोल ज्ञान प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला .सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये थोडे शिका पण चांगले दर्जेदार शिक्षण घ्या असा सूज्ञ सल्ला त्यांनी दिला .आजच्या संगणकीय स्पर्धात्मक युगामध्ये दर्जात्मक शिक्षण गरजेचे असून यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मार्गदर्शकांच्या सूचनांनुसार परीक्षा दिल्यास भविष्यात कोकणातील नवीन पिढी शासकीय अधिकाऱ्यांच्या जागेवर मोठ्या संख्येने कार्यरत झाल्याचे स्वप्न पाहता येईल असे मत व्यक्त केले.
महाडचे डीवायएसपी निलेश तांबे यांनी आपल्याला सुमारे एक तासापेक्षा जास्त काळ केलेल्या उद्बबोधनपर मार्गदर्शनात यूपीएससी व एमपीएससी परीक्षेमधील तौलनिक अभ्यासावर मुद्देसूद केलेल्या मार्गदर्शनपर भाषणाने उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये या स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला. स्पर्धात्मक परीक्षांचा मार्गदर्शनाआधी बोलताना श्री निलेश तांबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वैविध्यपूर्ण पद्धतीची माहिती देताना त्यांचे अर्थशास्त्रज्ञ, वकील, बहुजनाचे उद्धारकर्ते, घटना समितीचे अध्यक्ष, समाजसुधारक असे विविध पैलू उलघडून सांगून या महापुरुषांकडे पुढील पिढीने प्रेरणास्त्रोत तसेच आदर्श मार्गदर्शक म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले .आज राज्यातील विद्यार्थ्यांची स्पर्धा ही महाराष्ट्राबाहेरील राष्ट्रीय स्तरावरील विविध राज्यांतील विद्यार्थ्याशी असल्याने आपल्या मराठी विद्यार्थी विद्यार्थिनीना किमान मराठी इंग्रजी हिंदी या तीन भाषा अस्खलितपणे अवगत असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
आपल्या देशातील महापुरुषांचे व्हिडिओ पुस्तके व त्यांची माहिती विशेषकरून इंग्रजी माध्यमातून वाचल्यास त्यापासून बोध घेऊन स्पर्धा परीक्षांसाठी पूर्वतयारी करण्याचे आपले प्रयत्न यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला.
आपल्या कुटुंबातील आई वडिलांकडून मिळणारी ताकद व सभोवतालची प्रेरणा अशा स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची असल्याचे सांगतानाच वातावरणातील घडामोडींचा आपल्या संपर्काचा आपल्या बुद्धीमत्तेवर परिणाम होतो असे सांगितले. देश एकविसाव्या शतकात प्रगती करत असताना अजूनही देशाच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे मान्य करून स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक असणारी मानसिकता व आत्मविश्वास वाढल्यास कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला आपण यशस्वीपणे सामोरे जाऊ शकाल असे सूचित केले.
स्पर्धा परीक्षा या महासागर असून यामध्ये पोहत जाऊन तुम्हाला पलीकडे पोहोचावयाचे आहे त्यामुळे या परीक्षेदरम्यान उडी मारतानाच पूर्णपणे विश्वास युक्त पध्दतीने सामोरे गेल्यास ही स्पर्धा परीक्षा यशस्वी होणे कठीण नसल्याचे मत व्यक्त केले .
पुढील काळात प्रशासकीय नोक-या कमी होण्याची शक्यता वर्तवून याकरिता स्पर्धेसाठी लाखो अर्ज येतील मात्र यामध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यास व योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे स्पष्टकरून यूपीएससी एमपीएससी परीक्षेतील फरक समजावून सांगितला.
या वेळी उपस्थित काही विद्यार्थ्यांनी डीवायएसपी निलेश तांबे यांच्याकडून शंका निरसन करून घेतले. यानंतर प्रा. जाहीद वलीले व प्रा. संभाजी सूर्यवंशी यांनी या स्पर्धात्मक परीक्षेकरिता आवश्यक असलेल्या अन्य प्रकारच्या अभ्यासाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देताना वैविध्यपूर्ण पद्धतीचे वाचन आकलन व या संदर्भातील मार्गदर्शन घेण्यास विद्यार्थ्यांनी तत्पर राहावे असे सूचित केले.
याप्रसंगी आपल्या मनोगतामध्ये बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज तांबे यांनी या स्पर्धा परीक्षा शिबिराकरिता विद्यार्थी यानी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद देऊन पुढील शिबिरांचे आयोजन प्रत्येक तालुकास्तरावर केले जाईल असे सांगितले आगामी काळात कोकणातील तरुण तरुणी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेमध्ये रुजू व्हाव्यात यासाठी अन्य प्रकारच्या मार्गदर्शन शिबिरे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेमार्फत केले जाण्याचे त्यांनी जाहीर केले सुमारे तीन तास चाललेल्या या मार्गदर्शन शिबिराचे आभारप्रदर्शन मंदेश मोरे यांनी केले. या शिबिरासाठी महाड पोलादपूर माणगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिलेल्या प्रतिसादामध्ये निम्म्यापेक्षा जास्त संख्या विद्यार्थिनींची होती या कार्यक्रमासाठी बौध्द धम्म सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील शिर्के, हरेश मोरे खजीन दार, गौतम जाधव सदस्य, मंदेश मोरे, सिध्दार्थ गायकवाड, बार्टीचे व्यवस्थापक प्रकाश जामधाडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील कोर्पे, बाळू पवार, नरेश कदम, किरण दामुगडे हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सुञ सचालन सुधा साळवी यानी केले.
Comments
Post a Comment