नवी मुंबईतील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्याच्या मार्गावर
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला कारवाई करतील का? - अॅड. काशिनाथ ठाकूर
नवी मुंबई, दि. १० फेब्रुवारी (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीसांनी "एक कार्यक्षम पोलीस दल" असा लौकीक मिळविलेला आहे. परंतु अनेक ठिकाणी अवैध धंद्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्याच्या मार्गावर आलेली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बेकायदा जुगाराचे अड्डे व 50 पेक्षा अधिक लेडीज डान्समध्ये किळसवाण्या प्रकारांचा धिंगाणा सुरू असून याप्रकरणी वारंवार तक्रारी करून देखील हे प्रकार थांबत नसल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांचा या गैरप्रकारांवर वरदहस्त असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेला केलेल्या जाहीर आवाहनामध्ये स्पष्टपण म्हटले आहे की, "कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यामार्फत जनतेला न्याय मिळत नसेल तर त्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावे!" तसेच काही स्तरावर जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
परिणामी सर्वप्रथम हे बेकायदा गैरप्रकार होऊच नये व गैरप्रकार सुरू झाल्यास त्यांना साथ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीच प्रथम उचलबांगडी करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य हे जनतेच्या हिताचे ठरेल. त्याकरिता प्रथम पनवेल सुकापूर येथील राज क्लब येथे सुरू असलेला बेकायदा जुगार, तसेच पनवेल, नवी मुंबई हद्दीत सुरू असलेल्या 50 पेक्षा अधिक लेडीज डान्स बार मध्ये सुरू असलेले बेकायदा, अश्लील, नियमबाह्य प्रकार यांना साथ देणारे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या विरोधात पोलीस महासंचालक कोणती कारवाई करतील? की कारवाई करणारच नाहीत? हे पाहण्यासाठी सध्या या परिसरातील जनता उत्सुक झालेली आहे.
पनवेल, नवी मुंबई परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आलेले असून येथे ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली लेडीज डान्स बार मध्यरात्रीपर्यंत धिंगाणा सुरू असतो; तर काही बारमध्ये रात्रभर हुक्का सुरू असतो. इतक्या भयानक परिस्थितीमुळे या परिसरात कायदा - सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. परिणामी याप्रकरणी पोलीस महासंचालकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment