मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

धाटाव एमआयडीसी येथील हॉयबाख कंपनीला भीषण आग

रोहा (प्रतिनिधी) :- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धाटाव एमआयडीसीतील हॉयबाख कंपनीतील गोदामाला बुधवारी रात्री आठ वाजता भीषण आग लागली. साधारण दिड तास आगीचे तांडव सुरू होते. यावेळी साधारण १०० कामगार कंपनीत काम करत होते. तातडीने रोहा नगर परिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाचे चार बंब आगीच्या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कामगारांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. हॉयबाख कंपनी कापड, प्लास्टिक, छपाई आणि कृषी रसायन क्षेत्रासाठी रंगद्रव्ये आणि रंग तयार करते. दरम्यान, गोदामाला लागलेल्या भीषण आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाल्याची माहिती आहे. 

कारखाना निरीक्षकाचा अंकुश नसल्याने धाटाव एमआयडीसीतील अपघाताच्या घटना सुरूच आहेत. सप्टेंबर महिन्यात साधना कंपनीत झालेल्या स्फोटात चार तरुण कामगारांनी जीव गमावला. मात्र कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी कंपनी म्हणून ख्याती असलेल्या हॉयबाख कंपनीच्या गोदामाला आग लागल्याने धाटाव एमआयडीसीत कोणीही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले. ह्या आगीत कंपनीचा करोडो रुपयांचा मालसाठा भस्मसात झाल्याचं समजते. 

रात्री हॉयबाख कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याचे समजताच लगतच्या रोठ आणि धाटाव गावात नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली. आगीच्या आकाशात झेपावणारे धुराचे लोट पाहून अनेकांच्या हृदयात धस्स झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने आग नियंत्रणात आणली. 

"रात्री कारखान्यात लागलेल्या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. अपघाताच्या मूळ कारणाचा शोध घेतला जात असून नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत", असे हॉयबाख कलरंट्स इंडिया लिमिटेड चे साईट हेड अन्सार डांगे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog