रोह्यात नदीकाठी जैविक कचऱ्याची बेकायदेशीर होळी!
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
रोहा (संदीप सरफळे) :- रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यातून निर्माण झालेल्या विषारी धुरामुळे परिसरातील रहिवाशांची मोठी घुसमट झाली आहे. नियमानुसार अशा घातक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे बंधनकारक असताना, अज्ञात घटकांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीकाठी हा कचरा पेटवून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच खडबडून जाग आलेल्या नगर परिषदेने तातडीने पावले उचलत स्थानिक भंगार व्यावसायिक आणि नोंदणीकृत रुग्णालयांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही या घटनेची गांभीर्याने दखल घेत आज प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करणार आहेत.
शहरात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात असतानाच, थेट नदीकाठी सलाईनच्या बाटल्या, वापरलेल्या सुया, इंजेक्शनच्या काचेच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेले कापसाचे गोळे यांसारखा धोकादायक कचरा जाळला गेल्याने संपूर्ण कचरा व्यवस्थापन यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. चिपळूण येथील 'महाराष्ट्र बायो हायजेनिक मॅनेजमेंट' ही संस्था शहरातील कचरा संकलनाचे काम अधिकृतरीत्या करत असतानाही अशा प्रकारे कचरा उघड्यावर जाळला जाणे संशयास्पद मानले जात आहे. रोह्यात अनेक अधिकृत डॉक्टरांसोबतच काही बोगस डॉक्टरही सक्रिय असल्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या गंभीर प्रकरणावर भाष्य करताना नगरपालिका सभापती मयूर दिवेकर यांनी स्पष्ट केले की, या प्रकाराला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. डिसेंबर २०२२ मध्येही अशाच प्रकारची घटना घडल्यानंतर पालिकेने मार्गदर्शन शिबिरे घेऊन उपाययोजना केल्या होत्या, मात्र पुन्हा त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासकीय धाबे दणाणले आहेत. सध्या पालिकेने तपासाची चक्रे फिरवली असून दोषींवर कायदेशीर बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे.

Comments
Post a Comment