माणगांवमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्तींची विक्री सुरू
माणगांव (प्रतिनिधी) : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर करणे गरजेचे बनून राहिले आहे. रायगड जिल्ह्यातील माणगांवमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्तींची विक्री सुरू आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलतो आहे. काही अपवाद वगळता या सणाच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. गणेशोत्सवात सगळ्यात मोठा झालेला बदल म्हणजे गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा झालेला व्यापक शिरकाव तथा त्यातून निर्माण होत असलेल्या भयावह प्रदूषणाच्या समस्या. सोबतच पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, सजावटीकरिता प्लास्टिकचा वापर, थर्माकोलसारख्या विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर, जास्त घातक रासायनिक रंगाचा वापर, गुलालाची अतिरेकी उधळण, या सर्वामुळे मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.
गणेशोत्सवातून मोठय़ा प्रमाणात होणारे जलप्रदूषण रोखणे आवश्यक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठय़ा गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित होण्याएवढे पाणीदेखील नदी पात्रात नसते. गणेशभक्तांद्वारा त्या मूर्ती तशाच सोडून देण्यात येतात. या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. नदीपात्रात साचून राहतात. पर्यायाने नदीपात्रात प्लास्टरचा थर निर्माण होतो. परिणामी पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. पर्यायाने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होते. विहिरी, बोअर, तलाव आदींमध्ये पाणी न झिरपल्यामुळे ते कोरडे पडण्याचा धोका संभवतो. आपण नदीतील गाळाची माती सुपीक म्हणतो पण प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदीतील गाळाच्या मातीचा पोत खराब होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मूर्ती रासायनिक रंगांनी रंगवल्या जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते व त्याचा मानवी जीवनावर मोठा दुष्परिणाम जाणवतो. परिणामी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पीओपी मूर्तींपेक्षा शाडू मातीच्या गणेशमूर्तीच योग्य असल्यामुळे माणगांव येथील जयेश पैठणकर (मो.नं. 8793756982) आणि नागेश कदम (मो.नं. 9765094124) यांनी उभारे बिल्डींग, रेल्वे ब्रीज जवळ, निजामपूर रोड - माणगांव येथे शाडू मातीच्या सुबक गणेशमूर्तींची विक्री सुरू केली आहे.


