सावित्री सामाजिक संस्था व जनसेवा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वनवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप
माणगांव (राजन पाटील) : विशिष्ट जात, धर्म, पंथ, संप्रदाय यापलिकडे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे! हे तत्व डोळ्यासमोर ठेऊन, समाजातील व्यक्ती-व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा विकसन करण्याकरिता स्थापन झालेल्या सावित्री सामाजिक संस्था व समाजातील सर्वसामान्य माणसाला आधार देणाऱ्या जनसेवा संघटना माणगांवच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२० रोजी देगाव पंचक्रोशीतील देगाव आदिवासी वाडी, कुमशेत आदिवासी वाडी व शिरवली आदिवासीवाडी वरील वनवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सावित्री सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. कशिनाथ महादेव गायकवाड, सावित्री सामाजिक संस्था व जनसेवा संघटना माणगांव तालुका अध्यक्ष अॅड. अनिकेत काशिनाथ ठाकूर, सचिव योगेश पालकर, विशाल काळोखे, सुयोग दिवेकर, सचिन गायकवाड, प्रतिक दिवेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या समाजातच असणाऱ्या परंतु स्वतःच्या गरजा भागवू न शकणारा असाही एक समाज आहे की ज्याला मदतीची गरज आहे. मग असा समाज सण अथवा उत्सव असला की तो हताश, हतबल होऊन सण साजरा न करता दु:खी होतो. अशा वनवासी समाजाला दिवाळीचा फराळ देऊन आनंदी करण्याकरिता या सावित्री सामाजिक संस्था व जनसेवा संघटनेने हा उपक्रम केला असल्याचे अॅड. अनिकेत ठाकूर यांनी देगाव आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांना सांगितले.
हा वनवासी समाज पुढे जावा, हा समाज विकसीत व्हावा याकरिता ही सामाजिक संस्था व जनसेवा संघटना मोठे कार्य उभारणार असल्याचे सुतोवाच श्री. काशिनाथ गायकवाड यांनी केले. हा दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी घरातील माता-भगिनींनी कष्ट घेतल्या बद्दल देगाव आदिवासी वाडीवरील नारायण पवार, रमेश वाघमारे, रविंद्र जाधव, रेश्मा जाधव, समीर पवार, जमीर पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.





Comments
Post a Comment