सत्ताधाऱ्यांना दि. बा. पाटील यांच्या नावावर आक्षेप का? - ॲड. संदीप ताजने 
पनवेल (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भूमिपुत्रांची असेल तर याला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीची हरकत का ? असा सवाल ॲड. संदीप ताजने यांनी संवाद यात्रेच्या चौथ्या दिवशी पनवेल येथे आयोजित कार्यक्रमातून केला. आगरी,ओबीसी बांधव बसपासोबत आल्यास त्यांना दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याची गरज राहणार नाही. ते स्वत: शासनकर्ते होवून स्वत:चे प्रश्न स्वत:च सोडवू शकतील. कोकणातील भूमिपुत्रांनी त्यामुळे मागणी न करता सत्ताधारी व्हावे. विमानतळाच्या नावासंबंधी आगरी समाजाकडून करण्यात आलेल्या मागणीला बसपाचा पाठींबा आहे.
या सरकारने समाजबांधवांच्या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे.अशात या सरकारला समाजबांधवांनी चांगला धडा शिकवला पाहिजे.
बाबासाहेबांची चळवळ गतीमान करण्याचे जबाबदारी कोकणवासियांची
पनवेल महानगर पालिका निवडणूक बसपा पुर्ण ताकदीनिशी लढवणार आहे.आगामी निवडणुकीत तरूणांना मोठ्याप्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचा मानस पार्टीचा आहे. कोकणच्या मातीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे विश्वरत्न,भारतरत्न होवू गेले आहेत.त्यामुळे बाबासाहेबांची चळवळ गतीमान करीत ती यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी कोकणवासियांवर आहे.रायगड हा ऐतिहासिक जिल्हा आहे. रायगड मध्ये आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहला पाहिजे, याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सवांद यात्रे दरम्यान ॲड. संदीप ताजने यांनी यानिमित्ताने केले.
या कार्यक्रमात पार्टीचे महासचिव प्रा.प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव राजपाल गावंडे, जिल्हा अध्यक्ष फुलचंद किटके, ॲड. अनिल नागदिवे, सुरेश पवार, एल. यू. लिंगायत, लिनाताई गायकवाड, केशव साळवी, शाहिराताई शेख,युवराज वाघ,बंडु नागदेवे, ॲड. प्रताप पाटील, रायगड जिल्हा प्रभारी सिद्धार्थ मोरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रामदास शिंदे, महाड विधानसभा अध्यक्ष संजय गमरे, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख अमृताताई वाघमारे, श्रीवर्धन विधानसभा सचिव सुरेंद्र शेलार, तळा तालुका अध्यक्ष सुमनताई सकपाळ तसेच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.


Comments
Post a Comment